बंडखोर

बंडखोर हे असेच येती तृणापरी वेदीवर जळती
त्या ज्वलनाने जीर्ण भवाला नव्या युगाचा प्रकाश देती.

बंडखोर हे असेच जगती मरण ललाटावरती घेउन
ना दिसते ना असते त्यास्तव समिधेपरि हे अर्पित जीवन.

पृथ्वीवर येण्यापूर्वी हे सोमसुरेचा पितात पेला
दिव्य कैफ तो उरतो आत्मा अर्थ न राहे शरीरतेला.

निजकाळाच्या कुशीमधे हे सलती खुपती शुलाप्रमाणे
नगर शिवेवर निवास यांना सीमाशासित खलाप्रमाणे.

हे अनयाचे आक्रमणाचे दास्याचे जुलुमाचे वैरी
लौकिक धन वा विश्रांती ना उभी राहती त्यांच्या द्वारी.

बंडखोर हे असे कलंदर जनात राहुनि हे वनवासी
ईश्वर जेथे भुलतो चुकतो सावरती हे तिथे तयासी..

No Comments

Leave a Comment